Wednesday, November 7, 2018

सर्वस्पर्शी पुलं



आज महाराष्ट्रात दोन नावं अशी आहेत की ज्यावर उभा महाराष्ट्र एकदिल होतो. एक म्हणजे शिवाजी महाराज आणि दुसरे पुलं. आज हो अगदी आज दि नोव्हेंबर ८ २०१८ सोनियाचा दिनू आहे. एकतर दिवाळी, त्यात पाडवा आणि या सगळ्यात पुलंचा जन्म दिन आणि आज पासून पुलंच्या जन्म शताब्दी वर्षाला सुरुवात होतेय. पु. लं. च्या त्या लेखणीची, शब्दांची एकूण व्यक्तिमत्वाची काय किमया आहे की आज त्यांच्या लिखाणाला ७०-८० वर्ष उलटली तरीही व्यक्ती आणि वल्ली, गणगोत, जावे त्यांच्या देशा ही पुस्तकं पुन्हा पुन्हा वाचाविशी वाटतात. 


वाचनाची आवड माझ्याकडे तशी उशिरानेच अली. पण खरी वाचनाची आवड लागली ते व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकानं.  हरी तात्या, पेस्तन काका, नंदा प्रधान, नाथा कामत, चितळे मास्तर अशी डोळ्यासमोर उभी राहिली अवघी!  साधारण २००० साली मी मुंबईत नवीन होतो, तिथल्या वातावरणाला, त्या गर्दीला पार कंटाळून गेलो होतो, वैतागून हे शहर सोडून कुठंतरी पळून जावं असं तर मला अनेकदा वाटायचं. पण मग पुलंची एक एक पुस्तक वाचत गेलो आणि मुंबईतल्या गर्दीतही आनंद आहे. उघड्या डोळ्यांबरोबर मनाचे दरवाजे उघडे ठेवले तर दुनिया किती वेगळी दिसते हे कळलं. पुलंच्या वाक्यांनी आणि त्या लिखाणाने भाराऊन गेलो. मग जोगेश्वरीचं इस्माईल कॉलेज उगाच माझा काहीही संबंध नसताना आपलं वाटू लागलं. अंधेरी स्टेशन वर फलाटावरले चेहरे वाचू लागलो आणि हजारो भावना डोळ्यात दिसणारे ते हजारो अनोळखी चेहरे मला एखाद्या नाटकाच्या स्टेजवरचे वाटू लागले आणि हे ५-६ मिनिटांचं नाटक मी रोज न चुकता दीड वर्ष अविरत पाहिलं! केवळ पुलंमुळे.


या वाचनातूनच ऑफीसमधल्या व्यक्तीं मधल्या वल्ली दिसू लागल्या आणि माझा हातदेखील लिहिता झाला. आनंद मधला आनंद यात्री दिसला, ह्रिषीकेश मधले ह्रिषी दिसले आणि साधेपणाची ताकद दिसली ती कमलेशच्या रूपानं. माणसं कशी पाहावी, भाषा कशी ऐकावी, निरीक्षण कसं असावं, वल्लींचे बारकावे, संवाद हे कळत न कळत मी शिकलो. गोष्ट जरी लेखकाच्या भवती असली तरी त्यातला "मी" हा त्या व्यक्ती पेक्षा मोठा नसावा ह्याच पथ्य व्यक्ती चित्रणात मह्त्वाचं असत. नेमकं हे पाळल न गेल्यामुळे इतरांनी लिहिलेल्या किंवा नवोदित लेखकांनी लिहिलेल्या बऱ्याच व्यक्ती चित्रणात गोंधळ उडालेला दिसतो. पण पुलंच्या वल्ली वाचल्या आणि आत्मसात केल्या तर हे सहज लेखणीत उतरत.     

मी काही संगीत शकलेलो नाही पण पुलंमुळे आमच्या काळाच्या कितीतरी आधी झालेले गायक, संगीतकार, कवी पुलंनी केवळ त्याच्या शब्दांनी आमच्या समोर उभे केले. म्हणजे गुण गाईन आवडी आणि गणं गोत ही त्यांची पुस्तकं म्हणजे पर्वणी आहे. संगीत प्रेमींना वसंत खा देशपांडे भेटतात, मल्लिकार्जुन मन्सूर भेटतात, एका गाण्यात राहणारा माणूस मधून कुमारगंधर्वांची गायकी आणि त्यांच्या समोर उभं ठाकलेलं आव्हान त्यांनी किती धीरानं पेललं हे संगीत शिकणाऱ्या कुणाही होतकरू विद्यार्थ्यांसाठी कुठल्याही काळात मार्गदर्शन पर ठरेल. हिराबाई बडोदेकरांनी भारतीय शास्त्रीय संगीताचा मार्ग अनेक अवहेलना, अपमान सहन करून त्यांच्या नंतर येणाऱ्या गायिकांना मिळवून दिल्याचं कळतं. काल काल पर्यंतच्या आमच्या वडिलांच्या पिढीतल्या प्रभा अत्रे आणि माणिक वर्मा म्हणजे त्यांच्या होतकरू शिष्या होत्या असं सामान्य ज्ञानसुद्धा त्यातून मिळत. बाकी बाबा म्हणजे बा. भ. बोरकर हे भेटीला येतात आणि कवितेचं एक दार माझ्यासारख्या सामान्य वाचकांसाठी खुलं होत आणि सहसा कवितेच्या वैगेरे वाट्याला न जाणारा मी कविता संग्रह विकत घेऊन आनंदानं वाचतो हे पुलंच श्रेय आहे. त्यांच्या खास शैलीत ते केशवराव भोळेंबद्दल लिहितात. मग दोन घडींचा डाव, आधी बीज एकले आणि एकतत्व नाम दृढ धरी मनं हे अधिक गोड वाटू लागतं. गिरगावात एका गल्लीत मल्लिकार्जुन मन्सूर तर दुसरीकडे हिराबाई बडोदेडकर हे ऐकू की ते अशी परिस्थीती त्या काळच्या गणपती उत्सवात निर्माण होई. शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्या खास शाहिरी शैलीत लिहिणाऱ्या बाबासाहेबांचा आणि त्यांचा ऋणानुबंध पुलं आपल्या खास पद्धतीनं सादर करतात ते  गणगोत मधल्या बळवंत मोरेश्वर पुरंदरे तुन आणि वाचता वाचता कोपरखळ्या तर कुठे हास्य कारंजी फुलल्या वाचून राहत नाही.

जशी पुलंनी माणसं उभी केली तशीच त्यांनी आपल्या लेखणीतून देशा विदेशातील शहरं उभी केली. त्यांची विशेषता ही आहे की सॅन फ्रान्सिस्कोतुन फेरफटका मारता मारता ते आपलं बोट धरून आपल्याला मुंबईत घेऊन येतात. कधीही न पाहिलेलं दादर टी. टी. असं डोळ्या समोर उभं राहत. "अरे ती नऊ नंबरची ट्राम तरी ठेवायला पाहिजे होती" ही मुंबईकरांची भावना एका सहज वाक्यात मांडतात. नायगारा धबधब्याचं पुलंनी केलं त्या पेक्षा चांगलं वर्णन मी आजपर्यत वाचलेल नाही. अपूर्वाई वाचलं आणि माझ्या मनात लंडन आणि स्कॉटलँड बघायची प्रचंड ओढ निर्माण झाली, कधी मुहूर्त लागतो ते पाहायचं. प्रवासात काय पाहावं ह्याचा नवीन दृष्टिकोन त्यातून मिळतो. पुलंना सॅन फ्रान्सिस्कोन भुरळ घातली, मी सॅन फ्रान्सिस्कोतर अजून बघु शकलो नाही पण बॉस्टनच्या प्रेमात पडलो. एखाद शहर तुमच्याशी संवाद साधत म्हणजे काय हे जस अनेकांना मुंबईत कळत तसं मला ते बॉस्टन ला उमगलं!

कालक्षेत्रात सर्वस्पर्शी पुलं उत्तम संवादिनी वादक होते, पटकथा लेखक, नाटककार, उत्तम वक्तृत्व, अभिनय, उत्तम संगीतकार म्हणजे आजही बऱ्याच जणांना सांगितलं की माझे जीवन गाणे, शब्दावाचून कळले सारे, कौसल्येचा राम ही पुलंनी संगीतबद्ध केलेली गाणी आहेत तर त्यांचा विश्वास बसत नाही. मग इंटरनेटवर शोधून खात्री करतात आणि मग बोट तोंडात जातात!

ज्यांना पुलं आवडतात त्यांच्यासाठी हा कधीही न संपणारा विषय आहे. पण त्यांची काही वाक्य कायम मनामध्ये घोळत असतात.

#1.



# 2. आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.
- पु. ल.


-अमोल दाण्डेकर, मिनियापुलीस अमेरिका 
नोव्हेंबर ०८ २०१८ 

ऋणनिर्देश: Sketch : अभिजित देवघरे, नागपूर